Saturday, April 17, 2021

विसावा- गजानन देशमुख

 ही रात्रही सरावी, 

तो सूर्यही उगावा, 

स्वप्नांत मांडलेला, 

तो खेळ सत्य व्हावा.. 

तू मोहरून यावे, 

मज गंध जाणवावा, 

मी गीत तेच गावे, 

तू अर्थ पांघरावा...

तू सुस्वरूप ल्यावे, 

मी रंगहीन व्हावे, 

मग मात्र भावनांचा

मेळ ही बसावा... 

 बरसून तूच यावे, 

मी विरघळून जावे, 

मातीस आपला तो, 

गंध प्राप्त व्हावा...

तू एकटे बसावे, 

गाली कधी रूसावे, 

घटका भरामधे तो, 

राग दूर व्हावा.. 

क्षणभर कधी चिडावे, 

रागात ओरडावे, 

त्या ओरड्यात पुन्हा, 

सूर आपला जुळावा... 

या स्वप्नपूर्ततेची, 

मी कामना करावी, 

ही आस का म्हणोनी, 

माझ्या मनी उरावी, 

निष्ठुर नियतीला , 

का दया न यावी, 

वियोग आपला गे, 

काहूनी घडावा...

मी चित्र रंगवितो,

शून्यात पाहताना, 

डोळे मिटून घेतो, 

संसार थाटताना, 

नंतर भल्या पहाटे, 

अलवार जाग येते, 

मग आठवांमधे तुझ्या मी, 

घेतो जरा विसावा...

 ही रात्रही सरावी, 

तो सूर्यही उगावा, 

स्वप्नांत मांडलेला, 

तो खेळ सत्य व्हावा.. 

gajanansanjaydeshmukh©

18/04/2021

Thursday, March 25, 2021

'बोंब'

 ते नियम बनवतील;

तू तुझी तत्वं सोडू नको, 

त्यांचा नियम बहुमान्य होईल,

तू एकटेपणाला डरून डगमगू नको.. 

ते तुला चूक समजतील, प्रवाहाबरोबर वाहण्याचे सल्ले देतील;

तू ते कानानिराळे कर आणि

नैतिकता मात्र सोडू नको!

त्यांची अनैतिकता कदाचित नीतिमत्ता बनू पाहिल पण तू तत्वांवर लवचिकता लादू नको... 

मग त्या प्रस्थापितांना तुझं वर्तन, 

विद्रोही वाटेल कदाचित !

पण तू निष्ठा बदलू नकोस! 

ते स्वतः वर डाग न लागण्याची काळजी घेतील, 

तू ठाम राहून व्यापक हो आणि त्यांच्याच रंगाला डाग बनंव! 

तुझा आवाजही दाबतील ते एकवेळ, 

पण त्याच हाताच्या तुझ्या तोंडावर असण्याचा तुझ्या आरोळ्यांना फरक पडणार नाही;जर तुझी वेदना रडत असेल तर! 

तो हात बाजूला सारण्याचा यत्न कर,

तो हात किंचित बाजूला सरेल तुझ्या एकवटलेल्या बळाने ;  कायमचा नव्हे: पण तात्पुरता तरी! 

या कृतीची पुनरावृत्ती होईल, 

तू पुन्हा विव्हळशील :

ते पुन्हा तुझं मुस्काट दाबतील! 

पण वेड्या विसरू नकोस, यातूनही त्यांना समजेल की,हा आपल्याच हाताने "बोंब" मारतोय, 

जशी टाळी वाजत नाही एका हाताने; 

तसं बोंबलल्याही जात नसतं एकल्या गळ्याकडून ;

त्यांचा हाताचे वारंवार फटके बसलेत माझ्या तोंडावर म्हणून आपल्या बोंबलण्याला ते स्वतःच्या सार्वभौमत्वाचा धिक्कार समजतात,एक कृत्य म्हणून नाही; तर त्यांनी दाबला तरी  आवाज निघू लागला माझा म्हणून!

मग ते त्रासून तुझ्या बोंबलण्याला आपल्या मुत्सद्देगिरीने नीतिबाह्य ठरवतील ;

तू त्याला उपमर्द न समजता, 

आपली अस्मिता बनंव! 

तु आज समजणार नाहीस पण उद्या पूजला जाशील कारण या युगातंच नसेल ती क्षमता तुला समजून घेण्याची, मला वाटतं तू रात्रीतही जन्मला असशील! 

पण तू जर बाटल्या गेलास तर, तुझा सुर्योदयावरचा अविश्वास दुनियेसमोर येईल ;

अन्यथा तुझ्या क्षणिक विरोधाला लोक 'बाजारू' तरी म्हणतील! 

म्हणतात की,'सारख्या चेहऱ्याची सात माणसं जगात असतात' पण किती बरं झालं असतं सारख्या विचाराची सात माणसं किमान असली असती तर! 

पण तू अढळ रहा, 

त्यांच्या लायकीच्या पार तुझी निष्ठा असेल तर ते शेवटी तुला नक्कीच ग्राह्य धरतील; आपला म्हणून जरी नाही तरी अपवाद म्हणूनंच सही पण त्यांना तुला लक्षात ठेवावं लागेल ;आपला सिद्धांत मांडताना, तुझ्या अढळपणाची साक्ष देण्यासाठी!

           -गजानन संजय देशमुख

            २५/०३/२०२१

https://youtu.be/3YLFvCM1ask   - सदरील लिंकवर आपल्याला या कवितेचे विश्लेषण मिळेल.. 

8600792696

Wednesday, July 15, 2020

HSC results

महाराष्ट्र बोर्डाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचा निकाल उद्या लागणार आहे.....
यानिमित्त माझा मागील वर्षीच्या  'Day of Results' ला विद्यार्थ्यांना संबोधित करणारा संदेश नव्याने पाठवित आहे.
कृपया संदेश जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचवण्यात यावा ही विनंती...


*निर्धारक नव्हे ; तर निर्देशक....*
                --गजानन देशमुख
---------------------
 मित्रांनो आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातल्या अविस्मरणीय घटनांच्या यादीत जोडल्या जाणार आहे कारण आज  बोर्डाचा HSC  परीक्षांचा निकाल लागणार आहे जो की कित्येकांच्या जीवनात संधी आणि धोके घेऊन येतो काहींना स्वप्ने दाखवतो तर काहींच्या स्वप्नांची राख करतो .

प्रश्न हा आहे की आम्ही या निकालाला आमच्या आयुष्यात काय महत्व देतो !
सन्माननीय महामंडळाच्या प्रतिष्ठेचा मी आदर करतो पण सगळ्यात महत्वाचं वाक्य एकच लक्षात ठेवा की आजचा निकाल हा आपल्या बुद्धीमत्तेचा, आयुष्यातील यशापयशाचा किंवा तुमच्या वर्षभर केलेल्या अभ्यासाचा नसून तो केवळ प्रत्येक पेपर च्या 3 असा एकूण 18 तासांचा निकाल आहे ; हो !  "फक्त 18तासांचा !"
कदाचित तो कुणाच्या बाबतीत वर्षभराच्या मेहनतीचा अहवाल ठरेल किंवा कुणी  नैतिकतेला धाब्यावर बसवून खेळलेला खेळ ठरेल!
 त्यामुळे आज विजयश्री मिळविणारा आयुष्यभर प्रत्येक शिखर सर करेल किंवा आज ज्याला झुकतं माप मिळेल त्याला अपयशी असल्याचा शिक्का आयुष्यभर ललटावर मिरवावा लागेल अशतला ही भाग नाही.
या निकालामुळे तुमचं आयुष्य बदलणार नाही पण आयुष्यात होणाऱ्या बदलांची पार्श्वभूमी हा निकाल असू शकतो..
त्यामुळे आज लागणारा निकाल हा तुमच्या गुणवत्तेचा निर्देशक असेल निर्धारक नव्हे !
आपण अर्थशास्त्रात काल उपयोगिता शिकलो अगदी तीच गत  निकालाची आहे. या 10-15 दिवसांमध्ये या गुणांना अनन्यसाधारण महत्व  प्राप्त होईल पण कालांतराने यांना आजच्या दिवसा इतके महत्व नक्कीच उरणार नाही हा माझा वैय्यक्तिक अनुभव आहे..हे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की ,आजच्या भारलेल्या वातावारणाचा  दबाव काही लोकांना वाटू शकतो आणि यामुळे उद्दिपित होऊन निकाल प्रतिकूल असल्यास त्या  व्यक्ती स्वतःला पीडा करून घेतील ही  शक्यता देखील आपल्याला  नाकारता येत नाही!पण माझा सगळ्यांना आग्रह असेल की निकालाचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरती होऊ देऊ नका : अगदी जग्ग्ज्जेते असल्याचे भासवु नका आणि अगदी हताश देखील होऊ नका !

"Don't expect ; just accept "    कारण उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे सुपूर्द करण्यापूर्वी पर्यंत  आपण बदल घडवू शकत होतो मात्र तद्नंतर आपण त्यास्तव अक्षम असतो म्हणून आता वैतागून अर्थ नसेल!

आयुष्यात घडून येणार्या बदलांचा स्वीकार करा किंबहुना त्यांना सकारात्मक प्रतिभरण द्या.मार्कांमध्ये सापेक्ष चढउतार असणार आहेत आणि यश अपयश यांचे असे काही  निर्धारक मानदंड अस्तित्वात नाहीत! त्यामुळे यश-अपयश हे व्यक्तिबरहुकूम बदलणारे आहे ! मी कितीही तळमळीनं सांगितलं तरी जे व्हायचं ते होणार आहे....काही लोक यशाने हुरळून जाणार आहेत आणि काही लोक निराश ही होणार आहेत. पण भावी काळासाठी माझा, जे लोक गुणांच्या निकषाने  ranker  आहेत त्यांच्यासाठी  माझा  हा संदेश असेल की , यशाला सातत्य असेल तरच जिंकण्याची मजा आहे🥇✊ ; १ वेळी तर जुगारी पण जिंकतात.....अगदी तसंच  तुमचं यश हे नेहमीसाठी असलं पाहिजे, शाश्वत असलं पाहिजे! गुणांच्या दृष्टीने नाही ; पण गुणवत्तेच्या, नैतिकतेच्या दृष्टीने मात्र नक्की पाहिजे !

*पालकांना की विनंती* की कृपया निकालांतर इतरांची उदाहरणं आपल्या पाल्यांना ,टोचण्यांसारखी देऊ नका.माफ करा; मुले आपली आहेत मात्र त्यांनाही वैयक्तिक आयुष्य आहे  हे विसरून जाऊ नका. मुखत्वे मुलं वयाच्या या टप्प्यावर भावनिक संघर्षांचा सामना करत असतात, पौगंडावस्थेच्या या टप्प्यात त्यांचा  'स्व' विकसित होत जातानाच अशाच एखाद्या क्षुल्लक निकालामुळे आपण त्याला पार ठेचून टाकतो! मुलांना योग्य सल्ला नक्की द्या, उपदेश करा, दाखले द्या.(कृपया  त्यांना समवयस्क ,परिचित अथवा नात्यातील व्यक्तींची उदाहरणं आवर्जून टाळावीत)
माझ्या पाल्याच्या निकालामुळे माझी सामाजिक प्रतिष्ठा प्रभावित होईल असा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन प्राणपणाने जपणाऱ्यांनी लक्षात घ्यावं की मुलं म्हणजे काही तुमच्या प्रतिष्ठेची साधनं नाहीत.
आता त्यांना लागलेल्या निकालाबद्दल ओरडून शक्ती खर्च न करण्यातंच खरी हुशारी ! 
सद्यस्थितीत एक शक्यता तर खुप भयंकर आहे की निकाला नंतर नि:संशयपणे  मुलांच्या मोबाईलचा उद्धार होईल ....( एक बाब विसरून ही चालणार नाही की  लाॅकडाऊन असल्याने मोबाईलचा वापर वाढला आहे किंबहुना उर्वरित पर्याय ही अत्यल्प आहेत!)
वर्षभर आपल्या पाल्यांनी शाळा, शिकवण्यांना हजेरी लावली आहे, अभ्यास केला आहे, यथाक्षमता परीक्षा ही दिली आहे; मनोरंजनापुरता केला असेल ना वापर पण दिवस-दिवस नाही हे कृपया लक्षात घ्या! विद्यार्थ्यांनीही यशस्वीतेने हुरळून जाऊ नये किंवा अपयशाने खचून जाऊ नये.
 आपण उत्तीर्ण /अनुत्तीर्ण असं वर्गीकरण करू शकतो मात्र यशाला असं मोजता येत नाही!यश म्हणजे काय तर केवळ एक जय नव्हे तर सातत्यपूर्ण विजयांची अखंड श्रृंखला!
आणि अपयश म्हणजे तरी काय , तर वैफल्य, अनपेक्षित निराशा!
पण जे मला अनुकूल नाही ते प्रतिकूल आहे अशातलाही भाग नसतो.
"Let not failure to be the obstacle in your successful new beginning"
म्हणून ज्यांना वाटेल की आपण हरलो आहेत त्यांनी फक्त इतकंच लक्षात ठेवा की राखेतून पक्षी  जसा पुन्हा उठतो अगदी त्याच फिनिक्स पक्ष्याप्रमाणे तुम्ही पुन्हा उभारी घ्यावी....

आपणा सर्वांच्या भावी काळासाठी माझ्या सदिच्छा. 💐💐😊😊
        -गजानन संजय देशमुख©

Wednesday, June 10, 2020

टिळकांचे धर्मचिंतन

टिळकांचा कालखंड नेमका तोच जेव्हा भारत सरकार कायद्याद्वारे ब्रिटिशांची साम्राज्यवादी सत्ता हिंदुस्थानावर प्रस्थापित झाली;देशात पाश्चात्त्यीकरणाचे वारे वाहू लागले,ज्याचे परिणाम भारतीय समाजातील उच्चभ्रू वर्गावर दिसणे क्रमप्राप्त होते. अतिप्राचीन,गौरवशाली वैदिक संस्कृतीस व धर्मास पश्चिमिकरणाचे  ग्रहण लागले.अशा समयी श्रृतिस्मृतिपुराणोक्त धर्माचे आचरण करणारा तेल्यातांबोळ्याचा नेता जन्मास येणे ही वैदिक संस्कृतीला व धर्माला मिळालेली जणू नवसंजीवनी ठरली. प्रतिगामी विचारसरणी असल्याचा तर्कहीन आरोप आज दुर्दैवाने लोकमान्यांवर करण्यात येतो मात्र लोकमान्यांचे धर्मासंबंधीचे विचार तत्काली ही आजच्या राज्यघटनेतील तत्त्वांसह विसंगत नाहीत त्यांचे धर्मासंबंधीचे विचार अतिशय व्यापक,सर्वसमावेशक व सुधारणे संदर्भात लवचिक होते.लोकमान्यांच्या राजकीय,तात्विक,आध्यात्मिक,सांस्कृतिक व सामाजिक विचार व कृतींमध्ये प्रतिबिंबित होणारा हिंदुपणा अर्थात सावरकरांच्या व्याख्येनुसार "टिळकांचे हिंदुत्व".

 वेदप्रामाण्यवादी व कर्मसिद्धान्तवादी टिळकांनी दिलेली हिंदू धर्माची व्याख्या म्हणजे 'प्रामाण्यबुध्दिर्वेदेषु साधनानामनेकता। उपास्यानाम नियमश्चैत्यध्दधर्मस्य लक्षणे।। ', अर्थात वेद प्रमाण मानणे, ईश्वरप्राप्तीची अनेक साधने आहेत हे मान्य करणे आणि उपास्य देवतांसंबंधी ठराविकतेचे बंधन नसणे हे हिंदू धर्माचे लक्षण आहे.याच्याच पुढच्या भागात लोकमान्य म्हणतात "सो वै हिंदू:सनातन:", अर्थात सनातन हिंदू तो; जो श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्माने घालून दिलेल्या आचार धर्माचे जो पालन करतो व श्रद्धा-भक्तीयुक्त भावनेने जो आपल्या निहित कर्मांस चिकटून राहतो. उपासना मार्गांबद्दल वा उपास्य देवतांच्या ठराविकते बद्दल निर्बंध लादलेले नसल्याने वैदिक धर्म सर्वसमावेशक व उदात्त ठरून अनेक धक्क्यांनंतरही सावरू शकला.

"हिंदू या शब्दाचा अतिव्यापक अर्थ घेतल्यास तो हिंदुस्थानात राहाणाऱ्या परधर्मीय लोकांसही लागू पडतो." ज्याप्रमाणे सावरकर म्हणतात जेव्हा एक हिंदू ; हिंदू म्हणून मर्यादित राहात नाही तेव्हा तो उत्कट हिंदू बनतो अगदी तसेच टिळकांनी व्यावहारिक जीवनातही वेदांती तत्वांचा केलेला अंगीकार त्यांना हिंदू धर्मापुरते मर्यादित राहू देत नाही. विश्व ऐक्यासाठी वेदांत हा व्यापक मार्ग असून राष्ट्रीयत्व हे त्याचेच अल्प स्वरूप आहे या मान्यतेमुळे राष्ट्रासाठी संन्यस्त वृत्तीने झटणारे लोकमान्य महान कर्मयोगी सिद्ध होतात. 
ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी हिंदुस्तानी लोकांत ऐक्य भावनेचे मजबुतीकरण गरजेचे आहे त्यासह ३० पैकी २० कोटी लोकसंख्या हिंदू असल्याने हिंदूत्वाच्या संवर्धनाने राष्ट्रातील बृहत गट एकसंध राहू शकतो व इतरांसह एक्य साधण्यास वाव मिळतो अशी टिळकांची भूमिका होती. 
धर्मस्वातंत्र्य तथा विचार स्वातंत्र्यासम अधुनिक तत्वांना मान्यामान्यतेचे निकष सोडून ग्राह्य धरावे आणि स्वधर्म संवर्धनासाठी प्रयत्नशील असावे.टिळकांचा  धर्मप्रसारास यत्किंचितही विरोध नव्हता मात्र  त्याच्या नैतिक मार्गाबद्दल ते नक्कीच आग्रही होते.जैन वा बौद्ध धर्म प्रसाराची पद्धत ही  प्रतिवादी धर्मगुरूस युक्तिवादात हरविणे व धर्म मान्य करावयास लावणे ही तत्वचिंतनास वाव देणारी होती मात्र अज्ञान बालकांवर झडप घातल्या प्रमाणे बलाने परधर्मीयांना फितविण्याच्या मिशनऱ्यांच्या या पद्धतीमुळे त्यांचा धर्म हा वैदिक धर्माहून श्रेष्ठ नसला तरी निकृष्ट ठरतो व जोवर हिंदूधर्मासम व्यापक तत्वे ख्रिस्ती धर्मग्रंथात सापडणार नाही तोवर अम्ही धर्मांतर करीत नाही,असे जहाल परंतु स्पष्ट मत टिळकांचे होते.
वैश्विक ऐकासाठी प्रयत्नशील व्यक्ति जातीयवादाच्या संकुचित भेदांत विश्वास करेल तर नवल! ब्राह्मण व ब्राह्मणेतरवादाचा जातीय आधार टिळकांना पटणारा नव्हता.परकीय व्यक्तींपेक्षा ब्राह्मणेतर हिंदू नव्हे नव्हे तर हिंदुस्थानी अहिंदूही स्वकीय वाटतात. 
हिंदू-मुस्लिम वादावर "दंगा कोण करतो" या अग्रलेखात टिळक तार्किक परंतु परखड विचार मांडतात.टिळकांच्या मते हर धर्मियांस धार्माचरणाचा हक्क  आहे, मात्र त्या हक्कांच्या उपभोगापासून जर हिंदूच्या उपासनेत मुस्लिमांनी अडथळे आणले तर हिंदू ही खाटकापासून गायींना सोडवून आणतील अर्थात याबाबत सरकारने त्रयस्थपणे तटस्थ भूमिका बजावून दोषींना योग्य शासन करावे. तसेच मुस्लिम धर्मीयांत अशिक्षितपणाचे प्रमाण अधिक असल्याने ब्रिटिशांच्या चिथावणीला बळी पडतात. 
त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज वा इतर महापुरुषांना धर्मनिरपेक्षपणे पहावा असा सल्लाही ते देतात.असे विचार असणाऱ्या टिळकांचा दर्ग्यात नामघोष होणे ही इतिहासातील आश्चर्यकारक बाब आहे.
सावरकर व टिळकांचे वैयक्तिकरीत्या धर्मावर उपकार आहेत मात्र सूक्षातिसूक्ष्म भेद हा की सावरकर देखील वेदांत धर्माच्या संदर्भात म्हणतात की आगोदर इतरांनी धार्मिक वा राष्ट्रीय कट्टरतावादी 'त्वे' सोडावी तरच मीही माझ्या हिंदूत्वास मानवतावादात विलीन करेल.सावरकरांचाही धर्मास विरोध नव्हता मात्र धर्मीयांच्या वर्तनास जरूर होता मात्र टिळक इतरांबद्दल अपेक्षा न बाळगता स्वधर्म रक्षण करून परधर्मीयांबद्दलही स्नेह बाळगतात.सावरकरांनी हिंदू धर्म रक्षणाची चतु:सूत्री दिली तर टिळकांनी स्वराज्याची! 

धर्माचे प्राचीनत्व लक्षात घेता कालसापेक्ष सुधारणा टिळकांना मान्य होत्या मात्र धर्मसुधारणा करण्यासाठी आधी धर्मपालन केलेले हवे हे पटवून देताना टिळक प्रोटेस्टेंटपंथाचे संस्थापक मार्टिन ल्यूथर किंग यांचा दाखला देतात! संमतीवयाच्या कायद्याविरोधी भूमिकेने टिळकांना टीकेला सामोरे जावे लागले मात्र त्यांच्या दृष्ट्या विचारांचा आजही प्रत्यय येतो! सुधारणांसाठी परकीय शासकांद्वारे लादलेला कायद्याचा मार्ग अनैतिक असून लोकशिक्षणातून त्या स्वयंस्फूर्तीने घडून याव्यात यासाठी ते आग्रही होते. आजही लोकनिर्वाचित शासनाला धर्मा संबंधित कायदे सुधारणा करताना घेतल्या जाणाऱ्या विरोधी भूमिकेहून टिळकांची तर अनंत पटींनी व्यापक व वचिक  होती. 
आजही हुंडाप्रथेस वा कौटुंबिक हिंसाचारास कायद्याद्वारे प्रतिबंध केला असला तरीही सदर दुष्कृत्ये निदर्शनास येतात.चूकीच्या प्रथा, जागरूक होऊन समाजानेच झुगारून द्याव्यात हे त्यांचे मत. 

टिळकांच्या धर्माबद्दलच्या राजकीय राजकीय भूमिका जेवढ्या सखोल होत्या ; त्यांची धार्मिक तत्वचिंतनाची बैठकही तेवढीच पक्की होती. 
 वेदप्रमाण मानताना कौटुंबिक संस्कारांसह टिळकांचा वेदाभ्यासही तत्सम महत्त्व धारण करत होता.
 पूर्व प्रचलित वा परकीय परंपरा वा तत्वांचा अंधपणे स्वीकार न करता तत्वचिंतन व्हावे व योग्यतेचा स्वीकार व्हावा यासाठी ते आग्रही होते. 
पाश्चात्य शिक्षण घेतलेले युवक धर्मावर टीका करून स्वधर्मे निधनं श्रेय:।परधर्मे भयावह: ।। 
या गीतावचनाप्रमाणे वर्तन करीत. स्वधर्माचा अभिमान नसणारे स्वदेशाबद्दल अभिमान बाळगतीलच याबद्दल टिळक साशंक दिसतात. 
टिळकांच्या लिखाणातून तात्विक सखोलता लक्षात येते. धर्मकर्तव्याच्या आचरणास्तव हे अर्जुना तू लढावे, "तस्मादयुद्धथस्वभारत:",असा  धर्मकर्तव्याचे पालन करण्यासाठी युद्ध करण्याचा उपदेश रणामध्ये  महान क्षत्रियास योगेश्वराने  केला.
श्रीमद्भगवद्गीता हे ब्रह्मविद्यामूलक भक्तिसहचारी नीतिशास्त्र असल्याचे मत टिळक मांडतात.
ब्रह्मज्ञान व कर्म हे एकमेकांशिवाय एकदेशीय ठरतात व यांच्या संयोगाने मोक्षाचा मार्ग खुला होतो म्हणून कर्म महत्त्वाचे असे मानणारे टिळक ही राष्ट्रधर्माचे आचरण करणारे महान संन्यस्त कर्मयोगी ठरतात.भक्ती, ज्ञान व कर्म यांच्या संयोगाने अर्जुनाला युद्धासाठी भगवंताने प्रवृत्त केले हेच गीतारहस्य असे ते मानीत.गीतेवरील टीका मूळ गीतार्थासह सुसंगत असून पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन बाळगून लिहीलेली नसावी व नेमके पणाने समाजात पोहचावी ; ती ,पूजनीय नव्हे तर वाचनीय ग्रंथ म्हणून.एक टिळक चरित्रकार लिहीतात की,'टिळक संस्कृत पंडीत होते ते संस्कृत मधून टिळक भाष्य लिहू शकत होते,त्यांची इंग्रजी ही उत्तम होती म्हणून ते प्रसिद्धीचे टोक काबीज करू शकत होते 'गंभीर मात्र मूळ 'गीतारहस्य' हा ग्रंथ मराठी गद्यात निर्माण होऊन समाजात गीतार्थ प्रसारित व्हावा, असा टिळकांचा कर्मशास्त्रयोग लिहीण्यामागील मूळ उद्देश.
टिळक योगेश्वराच्या भागवत धर्माचे उपासक ,परंतु द्वैतवादी- अद्वैतवादी-विशिष्टाद्वैतवादी सिद्धांत;
वैष्णव-शैव-शाक्त पंथांचे धर्मातील स्थान व ऐतिहासिक महत्त्व यांस त्यांनी धर्मभेदाचे मूळ म्हणून पाहण्याऐवजी प्राधान्य दिले हे महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंकडून कळते. 
वेदकालनिर्णय व आर्यांचे मूळस्थान अर्थात ओरायन व दि आर्क्टिक होम इन वेदाज् या जवळपास जुळ्या वाटणाऱ्या ग्रंथाच्या लिखाणात ही टिळकांनी .इ.स.पूर्व ८००० वर्षांपूर्वी आर्य उत्तर ध्रुवाजवळ वास्तव्य करीत होते व नंतर वसतिस्थानच्या शोधात ते  उत्तरीय एशियन व युरोपीयन  प्रदेशात आले हे गृहीतक सिद्ध करण्यासाठी  वैदिक व
ऋचांचा तसेच
ओरायन मध्ये ही वेदनिर्मितीचा काळ हा इ.स.पूर्व ४००० असल्याचे मांडले आहे, त्यांनी केवळ भाषाशास्त्रीय आधार जो पाश्चात्य अभ्यासक वापरत, त्याला पंचागशास्त्राचा आधार दिला. ओरायन बद्दल "हा लेखक लिहीतो त्यात अपूर्व असे खरोखरीच काहीतरी आहे " असे प्रो.ब्लूमफीड यांनीही गौरवोद्गार काढलेे. 

टिळक ,छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आराध्य दैवत म्हणून करतात. तसेच गौरवशाली प्राचीन संस्कृतीचे आचरण करावे, त्यास्तव उत्सव साजरे करावे ही भूमिका संस्कृती संवर्धनाबाबत टिळकांची होती. टिळकांनी गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप देऊन धर्मांतर्गत एकोपा वाढीस लावला.तसेच इतके दिवस ताबूतांना नवस करणाऱ्या,डोल्यांपुढे नाचणाऱ्या हिंदूंनी गणेशोत्सव साजरा केल्याने मुसलमानांस हरकत तीं कोणती अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
१८ सप्टेंबर १८९४ च्या केसरी मधून टिळकांनी केलेले  गणेशोत्सवाचे वर्णन म्हणजे जणू उत्सवात सहभागी असलेल्यांचा उत्साहाचे प्रतिबिंबिच होय! 

 योगी वोळखावा योगेश्वरें | ज्ञानी वोळखावा ज्ञानेश्वरें | माहाचतुर तो चतुरें | वोळखावा ||
या श्रीसमर्थ वचनाप्रमाणे टिळकांनाही समकालीन अनेक अध्यात्मिक व्यक्तिमत्वांचा सहवास लाभला ज्यांत
सिद्धरुढ स्वामी,शेगावचे संत गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा, स्वामी विवेकानंद यांचा समावेश होतो. 
तसेच टिळक भेटीदरम्यान गजानन महाराजांनी टिळकांना सरकार शासन करणार असून त्यातून टिळकांकडून अलौकीक कार्य घडेल व साईबाबांनी त्यांना आराम घेण्याचा उपदेश केला असे संदर्भ उपलब्ध आहेत. 
कलकत्ता अधिवेशना दरम्यान टिळक कलकत्त्यात असताना विवेकानंदांनी मठात जातीने स्वागत केले, टिळकांनी तेथे हिंदूधर्म या विषयावर व्याख्यान ही केले व स्वामीजींशी चर्चा ही केली त्याचप्रमाणे शिकागो येथील धर्म परिषदेस उपस्थित राहण्यापूर्वी भारतभ्रमण करताना  स्वामी विवेकानंद टिळकांकडे पुण्यात १० दिवस वास्तव्यास होते. 
  टिळकांची अध्यात्मिक पातळी पाहायवस गेलो तर क्रांतिकारक दामोदर चाफेकरांनी फाशीच्या पूर्वी टिळक महाराजांच्या हातून श्रीमद्भगवद्गीता घेण्याची शेवटची इच्छा व्यक्त केली व ती पूर्ण देखील झाली यातच सर्वस्व आले. टिळकांच्या निधनानंतर दादासाहेब खापर्ड्यांनी दुसरे रामदास गेले म्हणून फोडलेला टाहो टिळकांची महत्ता सिद्ध करतो.
 एकेठिकाणी हिंदू धर्मा संबंधी मत व्यक्त करताना टिळक म्हणतात की, "मी जें सांगणार आहे ते कितीही जुन्या मतांचा इसम असेल तरीही त्यांस व नव्यासहि पसंत पडेल..."
स्वधर्माचरण करून, स्वधर्माभिमान व परधर्माबद्दल सहिष्णुता बाळगून राहण्याचा आदर्श मांडणाऱ्या टिळकांच्या व्यापक हिंदूत्ववादी विचारांची आज समाजाला आवश्यकता आहेच आणि यातून या दृष्ट्या व्यक्तिमत्वाच्या विचारांची सर्वकालिकता लक्षात येते. 
               -गजानन देशमुख©
             १०/०६/२०२०
संदर्भ-
१) टिळक भारत- करंदीकर
२) टिळक चरित्र-बापट
३) समग्र टिळक-न.चिं.केळकर
४) टिळक विचार-भा.कृ.केळकर

टीप:सदर लेखातील काही भाग संपादित करून टिळक स्मृती शताब्दी विशेषांक ,पुणे मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. (२३/०७/२०२०) 

Wednesday, June 3, 2020

टाहो...

"आपल्या सहोदर जीवांची कत्तल करून , एकट्यानेच माझ्या छाताडावर नाचू पाहणाऱ्या मानवा ; तुझा निर्वंश होताना पाहायचाय मला..😡
विश्व निर्मात्याला  मनुष्य या सर्वोत्कृष्ट निमिर्तीच्या अक्षम्य गुन्ह्याकरता आरोपीच्या पिंजर्यात उभं करण्यासाठी , या  मानवाच्या करंट्याक्रौर्याची साक्ष ; हवी तर मी देते ..☝️
पण सर्वांत कठोर शिक्षा त्याला कोणतं न्यायालयासन सुनावेल ? आणि कोणत्या कायद्याखाली? "🙂, पृथ्वी आपल्या पिलांच्या मढ्याशेजारी बसून आर्त टाहो फोडू लागली .
.-gajanan

Sunday, April 12, 2020

The Business Of Charity

💸 *औदार्याचा धंदा*💸
               -गजानन देशमुख
-----------------------------------------------------------------
आणि टाळ्यांच्या कडकडाटात आनंद आपल्या जागेवर जाऊन बसला.. "शाब्बास आनंद ; येत्या परीक्षेत पण हाच क्रमांक कायम ठेवायचाय बरं का", पाटील सरांनी असं म्हणून आनंदला, यश प्राप्तीचा आनंद झटकून पुढल्या आव्हानाला पेलण्यासाठी सज्ज राहण्याचं सूचना वजा आवाहन केले! पहिल्या बाकावर बसणारा आनंद कायम वर्गात अव्वल असायचा ; शिक्षकांची शाबासकीची थापच ह्या पैलवानाचा खुराक होता!
आनंदचे तीर्थरूप श्रीपती ; नावाचा प्रचलित अपभ्रंश होऊन हे शिरपती झाले!  शिरपती नगरपालिकेचा सफाई कामगार होता! गावातील गटारी साफ करण्याऐवजी नुकतीच त्याच्यावर घंटागाडीत कचरा गोळा करण्याची जबाबदारी येऊन पडली होती.अत्यंत करूण चेहर्याचा हा इसम मात्र आपल्या कामात आनंदी आणि समाधानी होता म्हणून "थोडा और"चा धसका ह्या पठ्ठ्याने केव्हाच घेतला नाही..
शिरपतीच्या बारश्यात त्याच्या आत्याने पण कदाचित उपहासाने त्याचं नामकरण केलं असावं : नाहीतर काय , प्रस्थापितांच्या दृष्टीने पाहिल्यास घरात अठराविश्व दारिद्र्य, श्री चा काही पत्ता नाही आणि हा कसला आलाय श्रीपती! पण "श्री" श्रीपतीच्या घरी धनलक्ष्मीच्या नव्हे तर गृहलक्ष्मीच्या रूपात रखमा म्हणून वास करायची म्हणूनच श्रीपतीची श्रीमती सुद्धा लंकेची पार्वती होती! त्यांच्या संसारात गरीबीतही श्रीमंती होती कारण त्यांच्या कडे स्वाभिमानाची संपत्ती होती आणि आनंदाचं वैभव होतं ; समजावतो :
ह्या श्रीपतीच्या समाधानी असण्याचं कारण म्हणजे रखमा!संसारशकटाचे संचालन करताना सोबत्याची वर्तणूक शकटाची दिशा निर्धारित करते! तिच्या भौतिक गरजा अत्यल्प होत्या ; तिला ना जरीची चोळी हवी होती ना काठाची साडी, सोन्यासारखा संसार असताना काय ठेवलय त्या सोन्याच्या दागिन्यात असा मानस होता तिचा! म्हणून तिच्याजवळ असणार्या संसाधनांची उपयोगिता तिच्यास्तव अत्युच्च होती ; आणि अर्थाशास्त्रात ह्यालाच तर समाधान म्हंटलय ना! श्रीपतीच्या 'पगारावर' घर धकवायचं कौशल्य हीस उत्तमप्रकारे अवगत होतं ; म्हणून तीने श्रीपतीच्या अंगात थोडंबहूत स्वाभिमानाचं रसायन भिनवलं ...श्रीपतीचे सहकारी दिवाळीला पाडवा मागत फिरायचे मात्र ह्याला तसलं काही करण्याचा विचार पण शिवायचा नाही!
तथाकथित मागासलेल्या  या जोडप्यानं मात्र आनंदवर संस्कार करण्यात कसलीच कसुर बाळगली नाही.त्यांचे संस्कार केवळ मोठ्यांचा आदर बाळगणं ,नम्रता,स्तोत्रं पठण,भाषिक स्पष्टता अशा धाटणीचे नव्हतेच मुळी ; तर त्यांनी ह्याला चुकल्यास लहानांचीही माफी मागायला शिकवलं , थोरांचा भितीयुक्त आदर बाळगण्यापोक्षा आदरयुक्त भीती बाळगायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यावर ह्यांनी श्रमप्रतिष्ठेचे संस्कार केले.
अशाप्रकारे हे संसारचक्र आनंदात सुरू होतं! मात्र एक कलाटणी अशी मिळाली की तीने सगळीच उलथापालथ केली!
श्रीपतीचा गेल्या महिन्याचा  पगार ही झाला नव्हता!५ दिवसांवर दिवाळसण होता. मात्र जीवनावश्यक गोष्टींचा साठा घरात मुबलक होता, बायको आणि पोर ही तसं समजूतदार होतं..
त्यांनी नव्या कपड्यांचा विषयही घरात काढला नाही कारण मर्यादित संसाधनांच्या वापराने अमर्यादित गरजांची पूर्ती करण्यास्तव गरजांच्या तीव्रतेचा क्रम लक्षात घेऊन तो जीवनावश्यक ते चैनीच्या असा असावा हा प्रो.राॅबिन्सचा सिद्धांत हे दांपत्य बेमालूमपणे आंमलात आणत होतं!
एकाएकीच पालिकेत एका एनजीओ चे ३ -४ स्वयंसेवक आले आणि मुख्याधिकार्यांच्या हस्ते सफाई कामगारांना कपडे आणि मिठाई देण्याचा मनोदय व्यक्त केला ; पगार न दिल्याचा रोष शमेल या हेतूने मुख्याधिकार्यांनाही भूरळ पडली! व्यक्तिवर्तनावर पडणारा सामाजिक प्रभाव की काय म्हणतात त्या अनुसारिता आणि आज्ञापालनाच्या संयुक्त प्रभावाने श्रीपतीनेही ती सहानुभूतीने दिलेली भेट स्वीकृत केली पण डाव इथेच पालटला कारण त्या स्वयंसेवकांनी सोबत छायाचित्रकार नेल्याचा पराक्रम गाजवला होता! मग काय ; श्रीपतीने घरचा  असंतोष भोगला!
 इकडे मात्र त्याचा वेगळाच परिणाम दिसणार होता.
सागर ने राहुलला खुणावलं "ए हे तर आनंदचे पप्पा आहेत रे"
 राहूलने आनंदला ते शाळेसमोरचं त्या समाजिक संस्थेचं बॅनर दाखवलं ज्यात की आपल्या कार्याचा उदोउदो आनंदच्या बापाच्या फोटो आणि "जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपूले " या तुकाराम बावांच्या अर्धवट अभंगसकट छापल्या गेला आणि आनंदच्या पायाखालची जमीन सरकली ; आज पर्यंत कधीच आपल्या बापाची, त्याच्या पेशाची लाज न वाटलेल्या आनंदच्या डोळ्यात आज शरमेने अश्रू तरळू लागले! तो तसाच चुपचाप वर्गात गेला !
आनंदवर जळणार्या टवाळखोरांना आयती संधी चालून आली,"अरेरेरेरे अल्लाह के नाम पे दे दो भैय्या कोई भगवान के नाम पे दे दो जी" अशी उन्मादाने काठोकाठ भरलेली कुजबुज  त्याच्या कानावर पडू लागली!
ऐकू येणारा प्रत्येक शब्द जणू त्याच्या जीवावर उठला होता... आनंद उठून उभा राहिला, मागे वळून पाहिलं मात्र तो बोलणार काय? काय देणार स्वाभिमानाचे दाखले? कारण आज तोच आज या प्रश्नाचे प्रक्षुब्ध होता की आपण केव्हा पासून गांजलो! आज पहिल्यांदाच आनंदचं वर्गात लक्ष नव्हतं! मन सतत त्याला खात होतं. शाळेची घंटा वाजली तसं त्याने झपाझप पावलं टाकीत घर जवळ केलं रस्त्याने जाताना ३-४ चौकात त्याला तेच बॅनर दृष्टीस पडले! आनंद घरी आला, हातपाय न धुता, गणवेश न काढता तसंच दप्तर धाडकन आदळून पलंगावर आडवा झाला.. रात्री श्रीपतीने जेवायला उठवलं त्याला मात्र डोळे उघडताच त्याला श्रीपतीची मूर्ती दिसली आणि क्षणार्धात तो फोटो आठवला ! आता त्याला सहन होणार नव्हतं , त्याच्या मोठ्याने दिलेल्या हुंदक्यात जणूकाही त्या तेजस्वी विद्यार्थ्यांचं सगळं धैर्य वाहून जाऊ लागलं! त्याने श्रीपतीला तोच सवाल केला की "नाना, कधीपासून गांजलो हो आपण?"
आजवर प्रतिदिन तो पोटाला पोटभर खात आला होता सरासरी २३०० उष्मांकापेक्षाही कैक जास्त म्हणून त्याने स्वतःला कधीच गरीबीच्या निकषात बसवून पाहण्याची तसदी घेतली नाही!
त्याचा असा प्रश्न ऐकून श्रीपती निरुत्तर झाला. पण श्रीपतीचा अहम् त्याच्या कृतीचं समर्थन केल्यावाचून राहणार नव्हता!

 "अरं गरीब न्हाय तर कायए ! कलेक्टरची औलाद हाय का मंग  तू!" तो नकळतपणे आनंदवर बरसला!
त्याक्षणी श्रीपतीचा अहम् जिंकला होता पण त्याने आनंदच्या " स्व "च्या पार चिंधड्या उडवून टाकल्या होत्या! बस्स! इतकीच ठिणगी वणवा पेटवायला पर्याप्त होती ; हिनेच उद्दीपक म्हणून भूमिका अदा केली आणि एका आत्मविश्वासू मुलामध्ये न्यूनगंडाची (inferiority complex) पाळंमुळं रुजवली!
अगदी आनंदचं वागणंच बददलं दुसर्या दिवशीपासून. पॅंट मध्ये ३६०° मध्ये खोसून शर्टींग केलेला सदरा आता बाहेर स्वातंत्र्य अनुभवू लागला,वर्गात शिक्षकांचा  प्रश्न विचारून होण्याआधीच ताडकन उठणारा हात आता समोरच्या डेस्कशी मैत्री करून बसला होता! रोजच्या चिडवाचिडवीने त्याला त्रस्त करून टाकलं होतं, arrogance वाढला होता त्यातला परिणामत: त्याने पहिल्यांदाच त्या टवाळखोरांच्या चमूला अद्दल घडवली होती!
आता वर्गातली मुलं त्याला थोडी दबकून होती ; त्याची एकदमच दहशद निर्माण झाली म्हणून चार दोन भाटांनी येऊन त्याच्या त्या मारहाणीचा प्रसंग त्याच्या उपस्थितीत रंगवून सांगणं क्रमप्राप्त होतं!
कायम एकटा राहणारा आनंद आता ४-५ मोकाट मुलांच्या घोळक्यात वावरू लागला.अभ्यासात स्वारस्य तर काहीच उरलं नव्हतं,वाटू लागलं त्याला की सोडियम आणि क्लोरीन च्या अभिक्रियेने कुठे आपली गरीबी दूर होणार आहे! तथाकथित परिणाम हाच की ; आनंद ,आनंद राहिला नव्हता..जवळपास सगळंच पार पालटून गेलं होतं!

 पाटील सर दोन महिन्यांची वैद्यकीय रजा संपवून पुन्हा रूजू झाले मधल्या काळात पोकळी निर्माण झाल्याने त्यांना लवकरात लवकर वर्गावर जायचं होतं, पाहायचं होतं पोटच्याहून प्रिय लेकरांना , अरे आणि हो त्यांना उत्सूकता लागली होती आपल्या लाडक्या आनंदला भेटण्याची, गेल्या चाचणीतील त्याचे मार्क ऐकण्याची, मधल्या काळातील वर्गातील घडामोडी त्याच्या तोंडून ऐकण्याची... मात्र जेव्हा त्यांनी वर्गात पाऊल ठेवलं तेव्हा पहिल्या बाकावर त्यांची नजर आनंदला शोधू लागली... "अरे आज आनंद आला नाही का रे राहूल?"
"आलोय नं सर" मागच्या बाकावरला आनंद लाजंकाजं उभा राहिला..
पाटील सर मोठ्याने ओरडले "आनंद! काय झालय काय तुला ?अरे मी काय बोलतोय तुला कळतय का............????तू मला शाळा सुटल्यावर भेटायला येणार आहेस"

आनंद शाळा सुटल्यावर स्टाफरूम मध्ये गेला आणि सरांना उडवाउडवीची उत्तरं देऊन निघाला कारण त्याचे टवाळखोर मित्र त्याची वाट पाहत थांबले होते!
 गृहपाठाच्या वह्यांचा गठ्ठा घेऊन राहूल, कुलकर्णी सरांच्या मागून चालत आला.. पाटील सरांना तो टापटीप गणवेशधारी आनंद डोळ्यासमोर दिसू लागला, जो सरांनी सुट्टीवर जाण्याआधी पाहिला होता!
"ए राहुल! अरे बाळा कसायस? बरं इकडे ये नं मला काम आहे थोडं! " राहूल सरांसोबत मैदानावर आला.. " आणि काय रे आपल्या आनंदने तर  नवा अवतार घेतलाय वाटतं", सर हसून बोलले! "नाही सर ते...... म्हणून तो असा वागतोय सर!आणि सर अाता तो आमच्यात डब्बापण खात नाहीये" राहूलने घडलेला प्रकार कथन केला!
बरं चल ते सोड,तू तो गायन क्लास सोडलाय की चालू आहे, सरने हळूच विषय बदलला कारण त्यांना आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं..

दुसर्या दिवशी सरांनी अभ्यासक्रमाबाहेरची कविता शिकवायला सुरू केली..
आनंद परिपाठानंतर उशीराने वर्गात आला.. सरांनी त्याला काहीच न बोलता वर्गात घेतलं!
तो आला तेव्हाचं कडवं सुरू होतं -
"कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे ; पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.... "

सरांनी जसं जसं स्पष्टीकरण द्यायला सुरू केलं तसं तसं आनंद पुढे कवितेतल्या सरांच्या पुरग्रस्त माजी विद्यार्थ्याच्या पात्रात स्वत:चं चित्र दिसू लागलं !
सरांनी पुढली कविता घेतली ती सुरेश भटांची गझल-
, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही!
            .......
येतील वादळे, खेटेल तुफान , तरी वाट चालतो...
अडथळ्यांना भिऊन अडखळणे,
पावलांना पसंत नाही....

      सरांची कविता सादर करतानाचा आवेश, त्यांचा आनंदसाठीचा उपदेश, संदेश त्या कवितेत प्रक्षेपित करू लागला...
आनंदला कळून चुकलं की पाणी कुठं मुरलं!

तो तास संपताच सरांच्या मागे धावत गेला,आणि कडकडून त्याने सरांना मिठी मारली , तशी त्याची आसवं गालावर ओघळू लागली.. सरांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याला बसायला लावलं ,त्याने स्वता:च सरांना सगळं सांगितले...
आणि मग सरांनी त्याला समजवायला सुरूवात केली , "अरे आनंद, तुला सांगू का तू गरीब नाहीयेस रे! इतके दिवसपण तुझे बाबा तेच काम करायचे ना तरी तुला तू गरीब वाटला नाही आणि आज काय झालय! "

"पण सर ते फोटो पाहून मला सगळे चिडवायचे आणि जेव्हा मी ते बॅनर पाहायचो मला झटकन दरिद्री असल्याची भावना यायची....",आनंदने सरांना मध्येच अडवलं ..
"अरे एकदा फोटो आला म्हणून काय तू गरीब झालास!  तुला सांगतो एखाद्याला आर्थिक परिस्थिती वरून गरीब म्हणणारे स्वतः विचारांनी दरिद्री असतात. आणि लक्षात ठेव आर्थिक गरीबीतून किमान रत्न तरी घडतात मात्र वैचारिक गरीबी वांझोटी असते, कारण ती राष्ट्राला उत्थानासाठी आवश्यक असलेले क्रांती नावाचं आपत्य कधीच देऊ शकत नाही...म्हणून तुझ्याजवळ स्वाभिमान आहे तर तू लाचार नाहीयेस.. चल उठ आता, उद्या पासुन पुन्हा समोर येऊन बसायचय हं आणि पुढच्या धड्यातले नवीन शब्द आणि त्यांचे अर्थ वाचून ये, उद्या वर्गात सांगणार आहेस तू! "
आनंद उठला आणि सरांकडे पाहून स्मितहास्य केलं की ज्यात अपार आनंद होता, साहस करण्याचं धाडस होतं....
आणि बरं का...
 आता आनंदची मादक नजर केव्हाची गायब झाली होती; आता त्याच्या डोळ्यात आगीचे डोंब दिसू लागले ज्यात वैचारिक दारिद्र्य भस्मसात करण्याचं सामर्थ्य होतं!त्याक्षणी पाटील सर सुद्धा जनकाच्या भूमिकेत होते ज्यांनी एका मनात वैचारिक क्रांतीला जन्माला घातलं होतं!!


     आता मित्रांनो विचार करा ; या प्रकरणाचा दोष कोणी स्वीकारायचा? उत्तर सोप्पं आहे - प्रत्येक घटक तेवढाच कारणीभूत आहे ,मात्र ती बाब सुरूवातीस वैयक्तिक स्तरावर मर्यादा राखून राहिली असती, पण जेव्हा त्या बॅनर तिला प्रसिद्ध केलं तेव्हा त्या प्रकरणाचा शिरकाव समाजाच्या परिघात झाला होता!
जर त्या बॅनरवर श्रीपतीचा फोटो नसता तर ह्या घटना मालिकेचा जन्म झालाच नसता. प्रत्येकालाच सावरून घेणारे पाटील सर मिळतील की नाही याची शाश्वती नाहीये म्हणून आपण कुणाच्या पतनाचे कारण ठरू नये हा यत्न सर्वांनी करावा!

सामाजिक जाणिवेतून केलेली मदत ही दान असते. त्याचा हिशेब ठेवायला, किंवा छायाचित्रांचा संग्रह करायला त्या मदतीचा काही देशाच्या Economic Survey मध्ये समावेश होणार नाहीये...
बौद्ध साहित्यात, दान पारमिता स्पष्ट करताना, जलकुंभ उलथून टाकल्यावर त्यात पाणी शिल्लक राहत नाही कारण कुंभाला पाण्याबद्दल आसक्ती नसते..

याचप्रमाणे ते लोक निव्वळ ढोंगी असतात ज्यांना आपल्या दातृत्वाचे उदात्तीकरण करून वाहवा मिळवायची असते! दाता होणे इतके सोपे नाहीये;
तथागथांचा प्रातीत्य-समुत्पादाचा नियम शेवटी स्वामित्वाला व त्यातून उत्पन्न होणार्या अशांतीला अधोरेखांकीत करतो ज्याचे मूळ तृष्णा असते...

व्यक्तीला स्वतःच्या कष्टाने प्राप्त केलेल्या गोष्टीचा परहितार्थ , फळाची अपेक्षा न बाळगता विनियोग करने सहजशक्य नसल्याने त्यातून स्वहित साधण्याचा व्यक्ति प्रयत्न करते आणि हे दानाचे रूपांतर सौद्यात होते!  ☝️
   दाता होणे सहज नाहीये;

 शतेषुु जायते शूर:
 सहस्त्रेषुच पण्डित: 
 वक्ता दशसहस्त्रेषु:
 दाता भवति वा न वा।

 आजच्या या आपदेच्या समयी पण आपल्या दानशूरपणाची प्रसिद्धी करणार्यांना फळे ही केवळ आर्थिक रूपात हवी नाहीत तर त्याचं स्वरूप आता सामाजिक प्रतिष्ठा आणि निवडणूकीतील मतं असं झालं आहे! ☝️
  म्हणून कृपया ही बाब लक्षात राहू द्या की त्यांची गरज ही त्यांची असमर्थता किंवा अक्षमता नाहीये.... म्हणून स्वताचं दातृत्व जरी समाजासमोर मांडायचं असेल तर खुशाल मांडा त्यातून इतरांना ही प्रेरणा मिळेल मात्र ही कळकळीची विनंती ही ती मदत स्वीकारणार्याची ओळख गोपनिय ठेवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
     
       आणि यासमोर ही हे फोटो प्रकरण सुरुच राहिलं तर ती परिस्थिती पाहता एवढंच म्हणता येईल की माणूसकीचं भांडवल करून सामाजिकतेच्या बाजारात आौदार्याचा धंदा मांडणार्या दलालांचा सुळसुळाट वाढलाय!😓
 
          

      - गजानन संजय देशमुख©
             
            12/04/2020