टिळकांचा कालखंड नेमका तोच जेव्हा भारत सरकार कायद्याद्वारे ब्रिटिशांची साम्राज्यवादी सत्ता हिंदुस्थानावर प्रस्थापित झाली;देशात पाश्चात्त्यीकरणाचे वारे वाहू लागले,ज्याचे परिणाम भारतीय समाजातील उच्चभ्रू वर्गावर दिसणे क्रमप्राप्त होते. अतिप्राचीन,गौरवशाली वैदिक संस्कृतीस व धर्मास पश्चिमिकरणाचे ग्रहण लागले.अशा समयी श्रृतिस्मृतिपुराणोक्त धर्माचे आचरण करणारा तेल्यातांबोळ्याचा नेता जन्मास येणे ही वैदिक संस्कृतीला व धर्माला मिळालेली जणू नवसंजीवनी ठरली. प्रतिगामी विचारसरणी असल्याचा तर्कहीन आरोप आज दुर्दैवाने लोकमान्यांवर करण्यात येतो मात्र लोकमान्यांचे धर्मासंबंधीचे विचार तत्काली ही आजच्या राज्यघटनेतील तत्त्वांसह विसंगत नाहीत त्यांचे धर्मासंबंधीचे विचार अतिशय व्यापक,सर्वसमावेशक व सुधारणे संदर्भात लवचिक होते.लोकमान्यांच्या राजकीय,तात्विक,आध्यात्मिक,सांस्कृतिक व सामाजिक विचार व कृतींमध्ये प्रतिबिंबित होणारा हिंदुपणा अर्थात सावरकरांच्या व्याख्येनुसार "टिळकांचे हिंदुत्व".
वेदप्रामाण्यवादी व कर्मसिद्धान्तवादी टिळकांनी दिलेली हिंदू धर्माची व्याख्या म्हणजे 'प्रामाण्यबुध्दिर्वेदेषु साधनानामनेकता। उपास्यानाम नियमश्चैत्यध्दधर्मस्य लक्षणे।। ', अर्थात वेद प्रमाण मानणे, ईश्वरप्राप्तीची अनेक साधने आहेत हे मान्य करणे आणि उपास्य देवतांसंबंधी ठराविकतेचे बंधन नसणे हे हिंदू धर्माचे लक्षण आहे.याच्याच पुढच्या भागात लोकमान्य म्हणतात "सो वै हिंदू:सनातन:", अर्थात सनातन हिंदू तो; जो श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्माने घालून दिलेल्या आचार धर्माचे जो पालन करतो व श्रद्धा-भक्तीयुक्त भावनेने जो आपल्या निहित कर्मांस चिकटून राहतो. उपासना मार्गांबद्दल वा उपास्य देवतांच्या ठराविकते बद्दल निर्बंध लादलेले नसल्याने वैदिक धर्म सर्वसमावेशक व उदात्त ठरून अनेक धक्क्यांनंतरही सावरू शकला.
"हिंदू या शब्दाचा अतिव्यापक अर्थ घेतल्यास तो हिंदुस्थानात राहाणाऱ्या परधर्मीय लोकांसही लागू पडतो." ज्याप्रमाणे सावरकर म्हणतात जेव्हा एक हिंदू ; हिंदू म्हणून मर्यादित राहात नाही तेव्हा तो उत्कट हिंदू बनतो अगदी तसेच टिळकांनी व्यावहारिक जीवनातही वेदांती तत्वांचा केलेला अंगीकार त्यांना हिंदू धर्मापुरते मर्यादित राहू देत नाही. विश्व ऐक्यासाठी वेदांत हा व्यापक मार्ग असून राष्ट्रीयत्व हे त्याचेच अल्प स्वरूप आहे या मान्यतेमुळे राष्ट्रासाठी संन्यस्त वृत्तीने झटणारे लोकमान्य महान कर्मयोगी सिद्ध होतात.
ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी हिंदुस्तानी लोकांत ऐक्य भावनेचे मजबुतीकरण गरजेचे आहे त्यासह ३० पैकी २० कोटी लोकसंख्या हिंदू असल्याने हिंदूत्वाच्या संवर्धनाने राष्ट्रातील बृहत गट एकसंध राहू शकतो व इतरांसह एक्य साधण्यास वाव मिळतो अशी टिळकांची भूमिका होती.
धर्मस्वातंत्र्य तथा विचार स्वातंत्र्यासम अधुनिक तत्वांना मान्यामान्यतेचे निकष सोडून ग्राह्य धरावे आणि स्वधर्म संवर्धनासाठी प्रयत्नशील असावे.टिळकांचा धर्मप्रसारास यत्किंचितही विरोध नव्हता मात्र त्याच्या नैतिक मार्गाबद्दल ते नक्कीच आग्रही होते.जैन वा बौद्ध धर्म प्रसाराची पद्धत ही प्रतिवादी धर्मगुरूस युक्तिवादात हरविणे व धर्म मान्य करावयास लावणे ही तत्वचिंतनास वाव देणारी होती मात्र अज्ञान बालकांवर झडप घातल्या प्रमाणे बलाने परधर्मीयांना फितविण्याच्या मिशनऱ्यांच्या या पद्धतीमुळे त्यांचा धर्म हा वैदिक धर्माहून श्रेष्ठ नसला तरी निकृष्ट ठरतो व जोवर हिंदूधर्मासम व्यापक तत्वे ख्रिस्ती धर्मग्रंथात सापडणार नाही तोवर अम्ही धर्मांतर करीत नाही,असे जहाल परंतु स्पष्ट मत टिळकांचे होते.
वैश्विक ऐकासाठी प्रयत्नशील व्यक्ति जातीयवादाच्या संकुचित भेदांत विश्वास करेल तर नवल! ब्राह्मण व ब्राह्मणेतरवादाचा जातीय आधार टिळकांना पटणारा नव्हता.परकीय व्यक्तींपेक्षा ब्राह्मणेतर हिंदू नव्हे नव्हे तर हिंदुस्थानी अहिंदूही स्वकीय वाटतात.
हिंदू-मुस्लिम वादावर "दंगा कोण करतो" या अग्रलेखात टिळक तार्किक परंतु परखड विचार मांडतात.टिळकांच्या मते हर धर्मियांस धार्माचरणाचा हक्क आहे, मात्र त्या हक्कांच्या उपभोगापासून जर हिंदूच्या उपासनेत मुस्लिमांनी अडथळे आणले तर हिंदू ही खाटकापासून गायींना सोडवून आणतील अर्थात याबाबत सरकारने त्रयस्थपणे तटस्थ भूमिका बजावून दोषींना योग्य शासन करावे. तसेच मुस्लिम धर्मीयांत अशिक्षितपणाचे प्रमाण अधिक असल्याने ब्रिटिशांच्या चिथावणीला बळी पडतात.
त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज वा इतर महापुरुषांना धर्मनिरपेक्षपणे पहावा असा सल्लाही ते देतात.असे विचार असणाऱ्या टिळकांचा दर्ग्यात नामघोष होणे ही इतिहासातील आश्चर्यकारक बाब आहे.
सावरकर व टिळकांचे वैयक्तिकरीत्या धर्मावर उपकार आहेत मात्र सूक्षातिसूक्ष्म भेद हा की सावरकर देखील वेदांत धर्माच्या संदर्भात म्हणतात की आगोदर इतरांनी धार्मिक वा राष्ट्रीय कट्टरतावादी 'त्वे' सोडावी तरच मीही माझ्या हिंदूत्वास मानवतावादात विलीन करेल.सावरकरांचाही धर्मास विरोध नव्हता मात्र धर्मीयांच्या वर्तनास जरूर होता मात्र टिळक इतरांबद्दल अपेक्षा न बाळगता स्वधर्म रक्षण करून परधर्मीयांबद्दलही स्नेह बाळगतात.सावरकरांनी हिंदू धर्म रक्षणाची चतु:सूत्री दिली तर टिळकांनी स्वराज्याची!
धर्माचे प्राचीनत्व लक्षात घेता कालसापेक्ष सुधारणा टिळकांना मान्य होत्या मात्र धर्मसुधारणा करण्यासाठी आधी धर्मपालन केलेले हवे हे पटवून देताना टिळक प्रोटेस्टेंटपंथाचे संस्थापक मार्टिन ल्यूथर किंग यांचा दाखला देतात! संमतीवयाच्या कायद्याविरोधी भूमिकेने टिळकांना टीकेला सामोरे जावे लागले मात्र त्यांच्या दृष्ट्या विचारांचा आजही प्रत्यय येतो! सुधारणांसाठी परकीय शासकांद्वारे लादलेला कायद्याचा मार्ग अनैतिक असून लोकशिक्षणातून त्या स्वयंस्फूर्तीने घडून याव्यात यासाठी ते आग्रही होते. आजही लोकनिर्वाचित शासनाला धर्मा संबंधित कायदे सुधारणा करताना घेतल्या जाणाऱ्या विरोधी भूमिकेहून टिळकांची तर अनंत पटींनी व्यापक व वचिक होती.
आजही हुंडाप्रथेस वा कौटुंबिक हिंसाचारास कायद्याद्वारे प्रतिबंध केला असला तरीही सदर दुष्कृत्ये निदर्शनास येतात.चूकीच्या प्रथा, जागरूक होऊन समाजानेच झुगारून द्याव्यात हे त्यांचे मत.
टिळकांच्या धर्माबद्दलच्या राजकीय राजकीय भूमिका जेवढ्या सखोल होत्या ; त्यांची धार्मिक तत्वचिंतनाची बैठकही तेवढीच पक्की होती.
वेदप्रमाण मानताना कौटुंबिक संस्कारांसह टिळकांचा वेदाभ्यासही तत्सम महत्त्व धारण करत होता.
पूर्व प्रचलित वा परकीय परंपरा वा तत्वांचा अंधपणे स्वीकार न करता तत्वचिंतन व्हावे व योग्यतेचा स्वीकार व्हावा यासाठी ते आग्रही होते.
पाश्चात्य शिक्षण घेतलेले युवक धर्मावर टीका करून स्वधर्मे निधनं श्रेय:।परधर्मे भयावह: ।।
या गीतावचनाप्रमाणे वर्तन करीत. स्वधर्माचा अभिमान नसणारे स्वदेशाबद्दल अभिमान बाळगतीलच याबद्दल टिळक साशंक दिसतात.
टिळकांच्या लिखाणातून तात्विक सखोलता लक्षात येते. धर्मकर्तव्याच्या आचरणास्तव हे अर्जुना तू लढावे, "तस्मादयुद्धथस्वभारत:",असा धर्मकर्तव्याचे पालन करण्यासाठी युद्ध करण्याचा उपदेश रणामध्ये महान क्षत्रियास योगेश्वराने केला.
श्रीमद्भगवद्गीता हे ब्रह्मविद्यामूलक भक्तिसहचारी नीतिशास्त्र असल्याचे मत टिळक मांडतात.
ब्रह्मज्ञान व कर्म हे एकमेकांशिवाय एकदेशीय ठरतात व यांच्या संयोगाने मोक्षाचा मार्ग खुला होतो म्हणून कर्म महत्त्वाचे असे मानणारे टिळक ही राष्ट्रधर्माचे आचरण करणारे महान संन्यस्त कर्मयोगी ठरतात.भक्ती, ज्ञान व कर्म यांच्या संयोगाने अर्जुनाला युद्धासाठी भगवंताने प्रवृत्त केले हेच गीतारहस्य असे ते मानीत.गीतेवरील टीका मूळ गीतार्थासह सुसंगत असून पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन बाळगून लिहीलेली नसावी व नेमके पणाने समाजात पोहचावी ; ती ,पूजनीय नव्हे तर वाचनीय ग्रंथ म्हणून.एक टिळक चरित्रकार लिहीतात की,'टिळक संस्कृत पंडीत होते ते संस्कृत मधून टिळक भाष्य लिहू शकत होते,त्यांची इंग्रजी ही उत्तम होती म्हणून ते प्रसिद्धीचे टोक काबीज करू शकत होते 'गंभीर मात्र मूळ 'गीतारहस्य' हा ग्रंथ मराठी गद्यात निर्माण होऊन समाजात गीतार्थ प्रसारित व्हावा, असा टिळकांचा कर्मशास्त्रयोग लिहीण्यामागील मूळ उद्देश.
टिळक योगेश्वराच्या भागवत धर्माचे उपासक ,परंतु द्वैतवादी- अद्वैतवादी-विशिष्टाद्वैतवादी सिद्धांत;
वैष्णव-शैव-शाक्त पंथांचे धर्मातील स्थान व ऐतिहासिक महत्त्व यांस त्यांनी धर्मभेदाचे मूळ म्हणून पाहण्याऐवजी प्राधान्य दिले हे महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंकडून कळते.
वेदकालनिर्णय व आर्यांचे मूळस्थान अर्थात ओरायन व दि आर्क्टिक होम इन वेदाज् या जवळपास जुळ्या वाटणाऱ्या ग्रंथाच्या लिखाणात ही टिळकांनी .इ.स.पूर्व ८००० वर्षांपूर्वी आर्य उत्तर ध्रुवाजवळ वास्तव्य करीत होते व नंतर वसतिस्थानच्या शोधात ते उत्तरीय एशियन व युरोपीयन प्रदेशात आले हे गृहीतक सिद्ध करण्यासाठी वैदिक व
ऋचांचा तसेच
ओरायन मध्ये ही वेदनिर्मितीचा काळ हा इ.स.पूर्व ४००० असल्याचे मांडले आहे, त्यांनी केवळ भाषाशास्त्रीय आधार जो पाश्चात्य अभ्यासक वापरत, त्याला पंचागशास्त्राचा आधार दिला. ओरायन बद्दल "हा लेखक लिहीतो त्यात अपूर्व असे खरोखरीच काहीतरी आहे " असे प्रो.ब्लूमफीड यांनीही गौरवोद्गार काढलेे.
टिळक ,छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आराध्य दैवत म्हणून करतात. तसेच गौरवशाली प्राचीन संस्कृतीचे आचरण करावे, त्यास्तव उत्सव साजरे करावे ही भूमिका संस्कृती संवर्धनाबाबत टिळकांची होती. टिळकांनी गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप देऊन धर्मांतर्गत एकोपा वाढीस लावला.तसेच इतके दिवस ताबूतांना नवस करणाऱ्या,डोल्यांपुढे नाचणाऱ्या हिंदूंनी गणेशोत्सव साजरा केल्याने मुसलमानांस हरकत तीं कोणती अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
१८ सप्टेंबर १८९४ च्या केसरी मधून टिळकांनी केलेले गणेशोत्सवाचे वर्णन म्हणजे जणू उत्सवात सहभागी असलेल्यांचा उत्साहाचे प्रतिबिंबिच होय!
योगी वोळखावा योगेश्वरें | ज्ञानी वोळखावा ज्ञानेश्वरें | माहाचतुर तो चतुरें | वोळखावा ||
या श्रीसमर्थ वचनाप्रमाणे टिळकांनाही समकालीन अनेक अध्यात्मिक व्यक्तिमत्वांचा सहवास लाभला ज्यांत
सिद्धरुढ स्वामी,शेगावचे संत गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा, स्वामी विवेकानंद यांचा समावेश होतो.
तसेच टिळक भेटीदरम्यान गजानन महाराजांनी टिळकांना सरकार शासन करणार असून त्यातून टिळकांकडून अलौकीक कार्य घडेल व साईबाबांनी त्यांना आराम घेण्याचा उपदेश केला असे संदर्भ उपलब्ध आहेत.
कलकत्ता अधिवेशना दरम्यान टिळक कलकत्त्यात असताना विवेकानंदांनी मठात जातीने स्वागत केले, टिळकांनी तेथे हिंदूधर्म या विषयावर व्याख्यान ही केले व स्वामीजींशी चर्चा ही केली त्याचप्रमाणे शिकागो येथील धर्म परिषदेस उपस्थित राहण्यापूर्वी भारतभ्रमण करताना स्वामी विवेकानंद टिळकांकडे पुण्यात १० दिवस वास्तव्यास होते.
टिळकांची अध्यात्मिक पातळी पाहायवस गेलो तर क्रांतिकारक दामोदर चाफेकरांनी फाशीच्या पूर्वी टिळक महाराजांच्या हातून श्रीमद्भगवद्गीता घेण्याची शेवटची इच्छा व्यक्त केली व ती पूर्ण देखील झाली यातच सर्वस्व आले. टिळकांच्या निधनानंतर दादासाहेब खापर्ड्यांनी दुसरे रामदास गेले म्हणून फोडलेला टाहो टिळकांची महत्ता सिद्ध करतो.
एकेठिकाणी हिंदू धर्मा संबंधी मत व्यक्त करताना टिळक म्हणतात की, "मी जें सांगणार आहे ते कितीही जुन्या मतांचा इसम असेल तरीही त्यांस व नव्यासहि पसंत पडेल..."
स्वधर्माचरण करून, स्वधर्माभिमान व परधर्माबद्दल सहिष्णुता बाळगून राहण्याचा आदर्श मांडणाऱ्या टिळकांच्या व्यापक हिंदूत्ववादी विचारांची आज समाजाला आवश्यकता आहेच आणि यातून या दृष्ट्या व्यक्तिमत्वाच्या विचारांची सर्वकालिकता लक्षात येते.
-गजानन देशमुख©
१०/०६/२०२०
संदर्भ-
१) टिळक भारत- करंदीकर
२) टिळक चरित्र-बापट
३) समग्र टिळक-न.चिं.केळकर
४) टिळक विचार-भा.कृ.केळकर
टीप:सदर लेखातील काही भाग संपादित करून टिळक स्मृती शताब्दी विशेषांक ,पुणे मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. (२३/०७/२०२०)
Congratulation bhau
ReplyDelete